श्रीहरी बाबांचे मंदिर
पवनामाईच्या पवित्र कुशीत पावन तीरावर पिंपळे गुरव गाव वसलेले आहे. पिंपळे गुरव हे सद्गुरू श्रीहरी खाडेबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. श्री क्षेत्र पिंपळे गुरव येथे श्रीहरीबाबांची समाधी आहे. आसपासच्या पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. श्रीहरीबाबांच्या समाधी मंदीरात साधकांना नामस्मरण करण्यासाठी गर्भगृहात ध्यानमंदीर आहे. ध्यानमंदीरातच श्रीहरीबाबांची समाधी आहे. समाधीचे दर्शन घेतल्यावर अनेक भाविकांना सुखद परमानंदाच्या अनुभूती आल्याशिवाय रहात नाही. ध्यानमंदीरातील प्रसन्नता साधकाला भाव समाधीचा आनंद देते. भक्तभाविकांच्या मनाला निरव, सुखद विश्रांती मिळते. हा अनेक भाविक जणांचा अनुभव आहे. दिवसभर मंदीरात वर्दळ असते. मंदिर आणि मंदिराच्या परिसरात सतत प्रसन्नता असते. मंदिर काटे पुरम चौकाच्या जवळ गांगर्डे नगर येथे आहे. मंदिराच्या पायऱ्या चढून वरती गेल्यावर सुंदर कासव मुर्तीचे दर्शन होते. मार्बल फरशीमध्ये सुंदर नक्षी काम असलेला सभामंडप पवित्र प्रसन्नतेची ओळख करून दिल्याशिवाय रहात नाही.
दोन बाजुनी चंद्राकृती कमानी चित्त आकर्षीत करून घेतात. समोरच अष्ट्कोनात बांधलेला गाभारा आणि त्यात असलेली राधाकृष्णाची मूर्ती प्रत्येक भाविकांचे मन मोहित करते. किमयागाराच्या मूर्तीकडे पाहिल्याबरोबर दृष्टी स्तब्ध होते. नमस्कारासाठी हात आपोआप जोडले जातात आणि मस्तक चरणी नम्र होते. देहुडा चरणी उभा असलेला श्रीकृष्ण परमात्मा पाठीमागे उभ्या असलेल्या गाईच्या खांद्यावर ऊजव्या हाताचा स्पर्शकरून व डावा हात राधेला स्पर्श करून उभा आहे. दोन्ही हाताने मुरली धरून राधेकडे पहात आहे. उजव्या हाताचा स्पर्श गाईला केला आहे हे वात्सल्यभावाच्या प्रेमाचे प्रतीक व डाव्याहाताचा स्पर्श श्रीराधेला हे भक्तीचे प्रतीक आहे.
प्रेम आणि भक्ती यांचा संगम म्हणजे कृष्णाच्या हातातील बासरी आहे. सहजच मुरलीधराचे दर्शन घडते. वामांगी उभ्या असलेल्या श्रीराधेचा उजवा हात श्रीकृष्णाच्या खांद्यावर आहे जणु भक्तीच जगतनियंत्याच्या खांद्यावर विसावलेली आहे. राधाकृष्णाच्या पाठीमागे उभी असलेली गाय श्रीकृष्णाच्या चरणाला चाटते तर गाईचे वासरू गाईला चाटते. एकंदरीत वात्सल्यभाव, प्रेमभाव व भक्तिभाव हा त्रिवेणी संगम राधाकृष्णाच्या मुर्तीचे दर्शन घडवते.
हातातील मुरली प्रेमाने भाविकाच्या मनाला मोहिनी घालत आहे आणि भक्तीचे दारिद्रय देशांतराला पाठवत आहे. श्रीराधेच्या हातातील फूल म्हणजे मनरूपी मोगरा भक्तिभावाने परमात्म्याला अर्पण करत आहे आणि गाई श्रीकृष्ण चरणाला चाटते यातुन शुद्धाचरणाने इंद्रिय एकमेकांच्या संगतीत राहून वात्सल्याच्या भावाचे दर्शन करण्यासाठी श्रीकृष्ण चरणी लिन झालेली आहेत. श्रीकृष्णराधा मूर्ती समोर सहज उभे राहिल्यावर शक्ती आणि भक्तीची दृष्टिभेट होते. मूर्तीच्या पाठीमागे प.पु.श्री.सद्गुरू साधुबाबा यांचा पद्मासनामध्ये ध्यानस्थ असलेले छायाचित्र दृष्टीस पडते. नामस्मरण करण्याची प्रेरणा बाबांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर मिळते. छायाचित्राच्या वरच्या बाजूला प्रणवचे सगूण रूप ओंकार भगव्या रंगामध्ये नटलेला आहे. भक्ताच्या चित्ताला चेतना देऊन चित्ताला चैतन्याच्या मिलनाचे दर्शन घडवते. मंदिराला प्रदक्षणा घालण्याचा मोह आवरतच नाही. कारण भाविकांना दर्शनात समाधान मिळते त्यामुळे अनेक भाविक प्रदक्षणा घालत असतात.प्रदक्षणा घालून मनावरच ओझे हलके करतात व निश्चिन्त मनाने सभामंडपात विसावतात.